स्वातंत्र्यसेनानी रावसाहेब पटवर्धन   

गाऊ त्यांना आरती : शिरीष चिटणीस

कार्यवाह, महाराष्ट्र साहित्य परिषद

१९२० मध्ये लोकमान्य टिळक यांचे देहावसान झाले. एका चैतन्यशील राजकीय कालखंडाचा शेवट झाला. त्यानंतर, राजकारणाची सुत्रे महात्मा गांधी यांच्याकडे आली. १९२० च्या अखेरीस नागपूरला काँग्रेस पक्षाचे अधिवेशन झाले, त्यामध्ये असहकारितेची कल्पना विविध कार्यक्रमाव्दारे स्पष्ट करण्यात आली. या निश्चीत कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य आंदोलनाची कल्पना सर्वसामान्यांपर्यंत नेता आली. सर्व तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला. देशासाठी प्रत्येक जण स्वार्थ त्याग करू शकतो ही भावना समाजात निर्माण झाली होती त्यास अधिक बळ मिळाले. स्वातंत्र्य लढ्यात नवचैतन्य आणि सामर्थ्य निर्माण झाले. सत्याग्रहाचे वारे वाहू लागले. या प्रवासात रावसाहेब पटवर्धन आणि अच्युतराव पटवर्धन आघाडीवर राहिले. 
 
देशभक्तीचे संस्कार बालपणापासून लोकमान्य टिळकांच्या रूपाने झालेल्या रावसाहेब पटवर्धन यांना विद्यार्थी दशेत ऐन तरुण वयात असतानाच गांधीवादाचा संस्कार मिळाला. त्यांच्या कर्तुत्वाची सुरवातच गांधीयुगात झाली. १९२० च्या दशकात ’फेरवादी व नाफेरवादी’ म्हणजेच कौन्सिल प्रवेशाला अनुकूल व प्रतिकुल हा वाद चांगलाच रंगला. १० वर्षे त्यात गेली. कौन्सिल प्रवेशाचा फारसा उपयोग होत नसल्याची जाणीव मोतीलाल नेहरू यांच्यासारख्या नेमस्त नेत्यांना होऊ लागली. काय करावे, काय करू नये यावर एकमत होईना. याच सुमारास १९२९ मध्ये सायमन कमीशन भारतात आले आणि या सायमन कमीशनवर बहिष्कार घालण्याचा काँग्रेसने निर्णय घेतला. 
 
सायमन कमीशनच्या निषेधार्थ लाहोर येथे प्रचंड निदर्शने झाली. त्यावेळी झालेल्या लाठीमारात पंजाबचे नरकेसरी लाला लजपतराय जखमी होऊन त्यांतच त्यांचा अंत झाला. देशातील वातावरण संतप्त व तंग झाले. जनमानसाच्या नाडीवर अचूक हात असलेल्या महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाचे रणशींग फुकले. स्वातंत्र्यलढ्यात देशभर तरुणांनी धडाधड उड्या घेतल्या. तुरुंगवास पत्करला; लाठ्या काठ्यांचा मार सहन केला तसेच बंदुकीच्या गोळ्यांनाही शौर्याने तोंड दिले. तुरुंगात असतांना स्वातंत्र्यप्रेमाबरोबर त्या स्वातंत्र्याचा अर्थ काय? आशय कोणता? यावर विचारमंथनाला प्रारंभ झाला. एका नव्या विचाराने, नव्या ध्येयाने प्रेरीत होऊन तरुण मंडळी तुरुंगाबाहेर पडली. त्यात रावसाहेब पटवर्धन आणि अच्युतराव पटवर्धन हे दोन बंधू पुढील काळात देशास परिचित झालेले दोन समाजवादी विचारसरणीचे तरुणही होते. 

नव्या कालखंडाचा प्रारंभ

एका नव्या कालखंडाची ही सुरवात होती. हा कालखंड जवजवळ स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालला. देव-देवगिरीकर, जेधे-गाडगीळ आणि नव्या विचारांच्या तरुण मंडळींचे नेतृत्व करणार्‍या पटवर्धन बंधूंनी हा कालखंड गाजविला. रावसाहेब पटवर्धन यांचा १९२९-३० च्या लढ्यातील पहिला तुरुंगवास. हा तुरुंगवास विचारमंथन करण्यासाठी तरुण क्रांतीकारकांना महत्वाचा ठरून स्वातंत्र्यलढ्याला दिशा देण्यास उपयोगी पडला. १९३०, १९३२, १९३९, व १९४२ अशा चारही स्वातंत्र्यलढ्यात रावसाहेब पटवर्धन यांनी दीर्घ मुदतीचा,कष्टमय, हालअपेष्ठांची परिसीमां गाठणारा कारावास भोगला. बनारस येथे उच्च शिक्षण घेतलेल्या रावसाहेब पटवर्धन यांना प्राध्यापक, संशोधक, वकील म्हणून लौकिक मिळवता आला असता, पण देशातील आस्थिर परिस्थितीने त्यांना अंतर्मुख केले व आपले सारे जीवन त्यांनी देशसेवेसाठी वेचायचा निर्धार केला. महात्मा गांधीजींच्या संघर्षात्मक व विधायक अशा दोन्ही कार्यात सक्रीय सहभाग घेतला. खादी व ग्रामोद्योग, अस्पृश्यता निर्मूलन, हिंदू-मुस्लीम ऐक्य व दारूबंदी या गांधीजींच्या चतु:सूत्री याचा आयुष्यभर त्यांनी पाठपुरावा केला. रावसाहेब पटवर्धन यांचा जन्म अहमदनगरमधील प्रसिद्ध ठिळकपंथीय वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सधन, सुसंस्कृत कुटुंबात झाला. रावसाहेब यांची जन्मतारीख १५ जुलै १९०३. त्यांचे वडील हरी केशव पटवर्धन हे लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि पुरस्कर्ते आणि नाणावलेले वकील. हरी पटवर्धन यांचे विचार पुरोगामी स्वरूपाचे होते. डॉ. अ‍ॅनी बेझंट यांच्या थिऑसॉफिस्ट विचारांचा त्यांच्या मनावर पगडा असे. रावसाहेबांचे नांव पुरुषोत्तम असे ठेवण्यात आले होते. त्यांना सर्व राऊ म्हणत असत. राऊचे रावसाहेब हे नांवच पुढे लोकप्रिय झाले. रावसाहेब यांच्यापाठोपाठ अच्युतराव, जनार्दनपंत, बाळासाहेब, पद्माकर, मधुकर आणि विजयाताई ही भावंडे जन्माला आली. महाराष्ट्रांत बालवीर चळवळीचे बीज हरी केशव पटवर्धन यांनी प्रथम अहमदनगरला पेरले. या संस्कारात रावसाहेबांचे सारे बालपण गेले. विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारावे आणि त्यांच्या ज्ञानात चौफेर भर पडावी हा हरीभाऊंचा कटाक्ष असे. या बहुश्रुत वातावरणातच पटवर्धन बंधूंची वाढ झाली. प्रसिद्ध लेखकांच्या कादंब-यातील उतारेचे उतारे रावसाहेबांना मुखोदगत असत. त्यामुळे वक्तृत्वाच्या चढाओढीत त्यांनी अनेक बक्षीसे पटकावली, त्यांच्या घरातच बालवीर चळवळीचे वातावरण असल्यामुळे प्रतिदिनी सत्कृत्ये करणे हा बालवीर धर्म ते कटाक्षाने पाळीत असत. सायंकाळी क्रीडांगणावर जाऊन ते नियमीत व्यायाम करीत. डॉ. अ‍ॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या होमरूल लीगचे काम हरीभाऊ पटवर्धन करीत असत. डॉ. अ‍ॅनी बेझंट अहमदनगरला आल्या की, त्यांचा मुक्काम पटवर्धन वाड्यातच असायचा. त्यांच्या थिऑसॉफिस्ट विचारांचा पगडाही लहानपणापासूनच रावसाहेब यांच्यावर होता. 

देशभक्तीचे संस्कार

रावसाहेब पटवर्धन यांचे शिक्षण नगरच्या सोसायटी हायस्कूलमध्ये झाले. हरीभाऊंनी त्यांच्या मुलावर आणि परिसरातील मुलांवर देशभक्तीचे संस्कार केले. आपला मुलगा सुसंस्कृत, सदाचारी व सत्प्रवृत्त व्हावा या सदिच्छेने हरीभाऊंनी रावसाहेबांना मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बनारस येशील हिंदू विद्यापीठात पाठविले. त्याठिकाणी डॉ. ग्यानचंद्र, प्रा. तेलंग यांसारख्या विद्वान, व्यासंगी व्यक्तीशी त्यांचा संबंध येऊन रावसाहेबांचे ज्ञान सखोल झाले. त्याचवेळी अखिल भारतीय वर्क्तृत्व स्पर्धेत त्यांचा पहिला क्रमांक येऊन त्यांना सुवर्णपदक मिळाले. नंतर पुण्याला येऊन कायद्याच्या परीक्षा दिल्या. विद्यार्थ्यानी वाचन करून सांस्कृतिक कार्यात भाग घ्यावा यासाठी त्यांनी या काळात ’नचिकेत मंडळ’ या नावाची संस्था काढली. प्रसिद्ध कवी हरिंद्रनाथ चटोपाध्याय हेही या कार्यात भाग घेत. वकिलीची परीक्षा उतीर्ण झाल्यावर वकिलीची प्रॅक्टीस करण्याऐवजी त्यांनी गांधीजींच्या कार्यात लक्ष घातले. निष्ठा, तपस्या व वक्तृत्व याच्या बळावर नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांनी देशप्रेमाचे व देशसेवेचे वातावरण निर्माण केले. १९३० सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत नगर जिल्हा सदैव आघाडीवर तळपला 

तो रावसाहेबांच्या प्रेरणेनेच ! 

महाराष्ट्रातील राजकारणाची धुरा समर्थपणाने वाहत असतांनाच अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्येही मानाचे स्थान त्यांना मिळाले. पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा पटवर्धन बंधूंवर अपार विश्वास होता, तथापि सत्तेतील मानाचे पान स्वीकारण्यास ते कधीही पुढे आले नाहीत. त्यांनी सर्वोदय कार्याला वाहून घेतले. त्यांचा मनःपिंड लहानपणापासूनच तत्वविवेचकाचा असल्यामुळे जे. कृष्णमूर्ती यांच्याही मतांचा त्यांच्यावर प्रभाव पडलेला असे. सेवादलातही त्यांनी नेत्रदीपक उत्तुंग कामगिरी केलेली आहे. वृत्तपत्रसृष्टीतही रावसाहेब पटवर्धन यांची कामगिरी स्पृहणीय आहे. नगरला ’संघशक्ति’ या नावाचे साप्ताहिक काढून जनतेची गा-हाणी दूर करण्याचे कार्य त्यांनी केले. साने गुरुजींच्या निधनानंतर ’साधना’ साप्ताहिकाचे ते संपादक झाले. ’साधने’ तूनही त्यांनी राजकारणाचे मार्गदर्शन केले. देशातील वृत्तपत्रांचे परिस्थितीचे नीट निरीक्षण करून वृत्तपत्रे व पत्रकार यांच्या संबंधी केंद्र सरकारला शिफारशी करण्याकरीता न्यायमूर्ती राजाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली सरकारने जे मंडळ नेमले होते त्या प्रेस कमीशनचे रावसाहेब हे सदस्य होते. १९३७ मध्ये मुंबईला भरलेल्या पुरोगामी लेखक परिषदेचे ते अध्यक्ष होते. ’केसरी’तून त्यांचे प्रसिद्ध झालेले अनेक लेख हे त्यांच्या चिकित्सक विचारवंत वृत्तीचे द्योतक मानावे लागतील. वैयक्तिक सत्याग्रहासाठी महात्मा गांधीजींनी रावसाहेब पटवर्धन यांची निवड केल्यामुळे त्यांना अटक झाली व साहजिकच १९४२ च्या क्रांती लढ्यात अच्युतराव पटवर्धन यांनी जे भूमीगत राहून कार्य केले तसे रावसाहेब यांना करता आले नाही. स्वातंत्र्योत्तर काळांत अच्युतराव आणि रावसाहेब या दोघांनीही राजकारणातून संन्यास घेतल्याने पटवर्धन बंधूंच्या विविध गुणांना तरुण पिढी पारखी झाली हे दुर्दैव होय. रावसाहेबांचा पिंड विचारवंतांचा असल्याने ते ’जे कृष्णामूर्ति’ यांच्या विचारधारेकडे वळले. लोकशाही, समाजवाद, स्वातंत्र्य, समानता याचा पदोपदी स्वातंत्र्यानंतर जप होत राहिला तरी देशहिताची तळमळ, त्याग, समाजसेवा या गुणांची किंमत घसरून महत्त्वाकांक्षी व स्वार्थी मंडळी पुढे सरकू लागली. स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी तळहातावर शीर घेऊन, गळफासाची पर्वा न करता समाजाची व स्वातंत्र्याची सेवा बजावलिले बाजूला फेकले गेले. रावसाहेब व्यथित होऊन या गदारोळात स्वतःहूनच बाजूला झाले. भाषावार प्रांतरचनेला त्यांचा पाठिंबा होता, तरी ज्या प्रकारे भाषावार राज्यांच्या चळवळी झाल्या ती पद्धत लोकशाहीच्या व कायद्याच्या मुळावर हे सांगण्यास ते कचरले नाहीत. त्याचप्रमाणे हा प्रश्न ’घटना’ तयार करतानाच हाताळण्यात आला नाही म्हणून पंडीत नेहरू यांना आणि इतरांना दोष देण्यास ते घाबरले नाहीत.

सर्वधर्म समभाव

लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय पक्षाचा झेंडा नगर शहरात आणि जिल्ह्यात अभिमानाने फडकावत ठेवणार्‍या पटवर्धन कुटुंबीयांनी नंतरच्या काळात महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या विचाराबरोबर काम केले. नेहरू आणि रावसाहेब पटवर्धन एका तर्‍हेने समानधर्मी होते. व्यापक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विचारसरणीने दोघांना जवळ आणले होते. काँग्रेसशी दोघांचे घनिष्ट संबंध. काँग्रेसच्या फैजापूर अधिवेशनाचे नेहरू अध्यक्ष आणि रावसाहेब स्वयंसेवकाधिपती! रावसाहेबांचे घराणे वडिलार्जित थिऑसॉफिस्टाचे, म्हणजे उदार धर्मवादाचे किंवा सर्वधर्म समभावाचे. स्वातंत्र्यसंग्राम चालू असता लोकशाही समाजवादी विचारसरणीची जी एक नवीन पिढी घडविली जात होती तिचे रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन प्रमुख घटक.
 
पंडीत जवाहरलाल नेहरू यांचे रावसाहेब पटवर्धन मित्र; पण रावसाहेबांनी राजकारण त्याग केले असल्याने त्यांचा उपयोग राष्ट्रकार्यात कुठेना कुठेे तरी करून घ्यावा, असे पंडीतजींना सारखे वाटत असे. त्यानुसार त्यांनी रावसाहेबांना काही जागा देऊही केल्या होत्या. एकदा रावसाहेब पंडीतजींचे वैयक्तिक प्रतिनिधी म्हणून काश्मीरची पाहणी करून आले. एकदा डॉ. राधाकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या युनेस्को शिष्टमंडळाचे सदस्य या नात्याने ते पॅरिसला जाऊन आले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंग्लंडमधील भारताचे हायकमिशनर म्हणून रावसाहेब पटवर्धनांची नेमणूक करावी असे पंतप्रधान नेहरूंना वाटले. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि ब्रिटनमधील  उच्चायुक्त पदाचे महत्व त्या काळात अतीव होते. अशा जागी पंडीतजींना आपल्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती हवी होती; पण रावसाहेबांची अनासक्ति एवढी की, त्यांनी पंडीतजींना नकार कळविला. कोणताही पदाधिकार स्वीकारण्याचे त्यांनी कटाक्षाने टाळले. नकार कळविला त्या पत्रामध्ये त्यांची सारी सौजन्यशीलता साकार झालेली दिसते. पंडीतजींना लिहिलेल्या उत्तरांत रावसाहेब म्हणतात... आपल्या मित्रमंडळात एक तरी मित्र असा राहू दे, की जो आपल्या कृपाछत्राखाली नाही! निरिच्छ माणसें सहसा सौजन्यशील नसतात; पण या दोन्ही गुणांचा क्वचित आढळून येणारा संगम रावसाहेबांच्या ठायी होता. जवाहरलाल नेहरू पुण्यात आल्यावर रावसाहेबांची भेट घेतल्याशिवाय कधीही परत जात नसत. शेवटी शेवटी तर पंडीत नेहरूंनी रावसाहेब यांना भारताचे उपराष्ट्रपतीपद स्वीकारण्याची गळ घातली होती; पण रावसाहेबांनी या पदासाठी सुद्धा नम्रपणे नकार दिला. रावसाहेब पटवर्धनांचे २८ ऑगस्ट १९६९ रोजी अचानक निधन झाले. एका थोर स्वातंत्र्यसेनानी व्यक्तिमत्वास भारत मुकला.
 

Related Articles